Pune : दरोडेखोरांचा पाठलाग करताना 2 दरोडेखोरांकडून सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गोळीबार, सर्वत्र खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील फलटणजवळ घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. पण या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे असे गोळीबार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील राजगड पोलिस स्टेशन हद्दीत दोन महिन्यापूर्वी पोलिसांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी येथील सराफाच्या दुकाणात घुसून गोळीबार करत दुकान लुटले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना या टोळीतील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यांचा पाठलाग करत असताना आज फलटण जवळ वडले गावात सहाय्यक निरीक्षक लांडे यांच्यावर गोळीबार केला आहे. सुदैवाने या गोळीबारात लांडे यांना गोळी लागलेली नाही. गोळीबार करून दरोडेखोर उसाच्या शेतात पसार झाले. त्यावेळी लांडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी त्यांचा पाठलाग करत त्यातील एका दरोडेखोराला पकडले आहे. तर दोन दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्या दोघांचा शोध घेतला जात आहे.

फलटण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान लांडे हे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे इंचार्ज असून, त्यांना माहिती मिळाल्याने ते या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.