‘ऑर्केस्ट्रा अँड बार’ मध्ये पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार ; उपनिरीक्षक गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरु असलेल्या हॉटेलच्या बाहेर भांडण सुरु असल्याची माहिती मिळाल्याने तेथे पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार करण्यात आला. गोळी पायाला लागल्याने पोलीस जखमी झाले असून वडगाव मावळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना ‘फ्लेवर्स’ हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. तर दादा बाळू ढवळे (३८, रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड), सुनील विलास पालखे (२७, रा. जांबे, मुळशी) आणि संतोष उर्फ बिट्या बाळासाहेब गायकवाड (२१, रा. जांबे) या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास जुन्या महामार्गालगत वडगाव मावळ पोलीसांच्या हद्दीत असणाऱ्या फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंट येथे भांडण सुरू असून एकाकडे रिव्हॉल्व्हर असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून रात्रपाळीवर असणारे उपनिरीक्षक मोहिते व त्यांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. दादा ढवळे आणि मनोज तेलगू यांच्यात भांडण सुरू होते. पोलीस आल्याचे समजताच दादा ढवळे हा शौचालयात जाऊन बसला.

मोहिते यांनी त्याला बाहेर काढले असता त्याने त्याच्या जवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्या पायावर गोळी झाडली. ही गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मोहिते यांच्यावर शस्त्रक्रिया करुन गोळी बाहेर काढण्यात आली. तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.