‘माथाडी’च्या नावाखाली व्यवसायिकाला खंडणी मागणाऱ्या 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माथाडीच्या नावाखाली ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाला खंडणी मागणाऱ्या दोघा सराईतांसह पाचजणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. जितेंद्र लक्ष्मण गुप्ते (वय ३२) अक्षय उत्तम गायकवाड (वय २७) अक्षय नंदू नडगेरी (वय २२) आकाश श्रीमंत बनसोडे (वय २४) शुभम शशिकांत बिळगीकर (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यापुर्वी गुप्तेविरुद्ध चार गुन्हे तर नडगेरीविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून शहरातील विविध भागात मालाची ने – आण केली जाते. दोन दिवसांपुर्वी त्यांच्या टेम्पोतील कामगार कोंढव्यातून माल घेउन सेव्हन लव्हूज चौकात गेले होते.

त्यावेळी माथाडीचे कामगार नसतानाही सराईत जितेंद्रने इतर चार साथीदारांच्या मदतीने टेम्पोवरील कर्मचाऱ्यांना आम्ही स्थानिक माथाडीचे कामगार असून, आमच्या भागातील माल आम्हीच खाली करणार, टेम्पोतील प्रत्येक पार्सलसाठी २० रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार तरुणाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पाचजणांना जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले अधिक तपास करीत आहेत.