Pune News : दुचाकी चोरणारी 5 जणांची टोळी गजाआड, 16 दुचाकी जप्त

राजगुरुनगर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे ग्रामीण परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 दुचाकी आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी आठ दिवसांपूर्वी राक्षेवाडी येथील एका मोबाइल शॉपी समोरून दुचाकी चोरुन नेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना खेड पोलिसांनी टोळीला अटक केली.

नवनाथ विजय पवार (वय -21 रा. माळवाडी, साकुर), सुनील रामनाथ जाधव (वय-19 रा. माणूसवाडी, रणखांब, ता. संगमनेर, जिल्हा. अहमदनगर), अजित रावसाहेब केदार (रा. रणखांब – उपळी), रमेश अंबादास दुधवडे (रा. खैरदारा, नांदूर), शिवाजी पोपट कातोरे (रा. जांबुवंत, सर्व रा. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करम्यात आलेल्या आरपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथून बुधवारी (दि.3) जुपिटर दुचाकी चोरीला गेली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले व त्यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. रविवारी (दि.7) सायंकाळी पाबळ रोड येथे गस्त घालत असताना दोन वेगवेगळ्या दुचाकीवरुन संशयित येताना दिसले. त्यांना थांबवून त्यांकडे असलेल्या हिरो एच एफ डिलक्स दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीच्या असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी इतर आरोपींची नावे सांगितले. आरोपींनी राक्षेवाडी येथून दुचाकी चोरी केल्याचा कबुली दिली.

आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी मागील काही महिन्यात खेड, घारगाव, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले व इतर ठिकाणाहून 16 दुचाकी व तीन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी 16 दुचाकी आणि तीन मोबाइल असा एकूण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस निरीक्षक संदेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखिल गिरीगोसावी, स्वप्निल गाढवे, सुधीर शितोळे यांच्या पथकाने केली.