Pune : शनिवारवाडा येथे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता नुतन जिल्हाधिकारी कार्यालयात तर शनिवारवाडा येथे सकाळी ठिक 8.00 वा. मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

तसेच मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) पुणे येथे सकाळी ठिक 9.05 वाजता राष्ट्र ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साहाने समारंभ साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा, यासाठी शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास असा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी त्या दिवशी सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर करावयाचा आहे.

ध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहणा-या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाखात यायचे आहे. उपस्थितांनी योग्य त्या पध्दतीने राष्ट्रध्वजास सलामी द्यावी आणि इतरांनी दक्षतेने ओळीत उभे रहावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात मर्यादा येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोना योध्दे, जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारांवर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मास्क बंधनकारक असून सामाजिक अंतर राखावयाचे आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.