पुण्यात पैशांसाठी झाडांच्या फांद्याऐवजी चक्क 27 झाडेच कापली, शंकरशेठ रस्त्यावरील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शंकरशेठ रस्त्यावरील एसटी स्थानकाच्या कार्यशाळेत झाडांच्या फांद्या कापण्याऐवजी आर्थिक फायद्यासाठी 27 झाडेच कापण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी विभागीय अभियंता विजय कृष्णा रेडेकर (वय 51, रा. वडगाव बुद्रुक) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र पोळ आणि रवींद्र सखाराम सावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील एसटी कार्यशाळेत मोठया प्रमाणात झाडी आहे. या झाडांच्या फांद्या वाढल्या होत्या. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांना त्रास होत असत. तर, बस लावण्यास अडचण येत होत्या.

या फांद्या सोसायटीच्या गॅलरीत गेल्याने त्यावर पक्षी बसत असत. त्याचा त्रास येथील नागरिकांना होत होता. याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेच्या वनविभागाकडे झांडाच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. महापालिकेने पहाणी करून धोकादायक झालेल्या 32 झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली होती.

या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोळ यांनी सावले यांना निविदा भरण्यास सांगितले. त्यांनी एसटी महामंडाळाच्या झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या. त्यामुळे मंडळाकडून झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी सावले यांना अटी घालून कंत्राट दिले होते

मात्र, फांद्या तोडण्यास उशीर झाल्याने परत मुदतवाढ दिली. 20 फेब्रुवारीपासून फांद्या तोडण्याचे काम सरू होते. फिर्यादींना 29 फेब्रुवारी रोजी समजले की कंत्राटदार यांनी फांद्या ऐवजीच बुंध्यापासून झाडेच तोडली आहेत. त्यामुळे त्यांनी सावले याला कार्यालयात बोलवून घेतले. चौकशी केली असता ते काहीही न बोलता निघून गेले. पोळ यांनी रवींद्र सावले यांना झाडांच्या फांद्या तोडण्याचे कंत्राट घेण्यास लावून दोघांनी मिळून शासकीय सुट्टीच्या कालावधीत एसटी प्रशासनाच्या कामगारांचे लक्ष नसताना 27 झाडांची कत्तल केली. त्यानंतर झाडांचे बुंधे स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी घेऊन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.