Pune : वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष, डॉ. अंजली साबणे यांच्याकडे जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासकिय कामाकरिता महापालिकेमध्ये स्वतंत्र करण्यात येणार आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

महापालिकेच्यावतीने डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय व परिसरातील २० एकर जागेवर हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या या हॉस्पीटलसाठी नुकतेच ट्रस्टची नोंदणीही करण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयासाठी आवश्यक काही वर्गखोल्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पीटल लगतच्या कै. बाबूराव सणस कन्याशाळेत बांधण्यात येणार आहेत. या वर्गखोल्यांच्या कामासाठीच्या निविदांनाही नुकतेच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्यात आली असून महाविद्यालयाच्या बांधकामाचा आराखडा देखिल अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच विविध विभागांच्या परवानग्यांनाही चालना मिळाली आहे. हे काम गतीने व्हावे यासाठी महापालिका भवनमध्ये स्वतंत्र प्रशासकिय कक्ष तयार करण्यात येणार आहे. हा कक्ष उभारण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे आज सोपविण्यात आली आहे.

You might also like