राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच लक्ष लागले होते. आज पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांना नियुक्तीचे पत्र दिले.

चेतन तुपे हे मागील अडीच वर्षापासून पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून त्यांनी शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. अखेर शहराध्यपदाची माळ प्रशांत जगताप यांच्या गळ्यात पडली.

प्रशांत जगताप यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान पक्षाचे प्रभारी शहराध्यपद भूषवले आहे. विद्यमान शहराध्यक्ष चेतन तुपे यांना हडपसरमधून उमेदवारी दिल्यानंतर पक्षाने प्रशांत जगताप यांना प्रभारी शहराध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने पेलली होती.