पुणे : माजी खासदार संजय काकडे यांना न्यायालयाकडून जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गुंड गजानन मारणेच्या रॅली प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या माजी खासदार संजय काकडे यांना न्यायालयानं जामीन दिला आहे. 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात काकडे यांना अटक करण्यात आली होती. काकडे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून रिमांड रिपोर्टव्दारे काही दावे करण्यात आले होते मात्र न्यायालयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे.

कुख्यात गुंडे गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सूटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी जंगी रॅली काढली होती. त्या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तात्काळ व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्हयाच्या चौकशीसाठी काकडे यांना गुन्हे शाखेत देखील बोलावण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी काकडे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून रिमांड रिपोर्टव्दारे त्यांच्याकडे तपास करावयाचा असल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे.

बातमी सविस्तरपणे …..

कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे व माजी खासदार संजय काकडे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असल्यावरून संजय काकडे यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने काकडे यांची जामीनावर सुटका केली आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. IPC कलम 290, 506, 120 ब आणि क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्टनुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी तक्रार दिली आहे.

गुंड गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आज बुधवारी सकाळी काकडे यांना गुन्हे शाखेने याप्रकरणात अटक केली. दरम्यान, रॅली प्रकरणी मारणे विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत.

मारणे रॅली प्रकरणात दाखल गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्यावर काकडे हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याची शक्यता आहे. तसेच ते साक्षीदार यांच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याची शक्यता असल्याने तसेच प्रलोभन दाखवण्यापासुन, धमकी देण्यापासुन किंवा अभिवचन देण्यास त्यास प्रतिबंधक करण्या करिता त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, मारणे आणि काकडे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नेमके कोणते संबंध आहेत यावरून अजून पडदा उठलेला नाही.

मारणे कारागृहातुन सुटल्यानंतर रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा कट कोणी रचला?, या गुन्हयाचा कट कोणत्या ठिकाणी रचला गेला ? सदर कटात आणखी कोण कोण सहभागी आहे. या गुन्हाचा कट रचाण्यामागे अटक आरोपी यांचा नक्की उद्देश काय आहे? याबाबत काकडे यांच्याकडे तपास करण्यात येणार आहे. तसेच या सदर गुन्हयातील अटक आरोपी यांनी सोशल मिडीयावर दहशत पसरविणे करीता कोणकोणत्या साथीदारांची मदत घेतली? त्याचा या गुन्हयाशी काय संबंध आहे? असे या रिमांड रिपोर्टमध्ये कारणे देण्यात आली होती.

काकडे यांच्या वतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर काकडे यांची जामीनावर सुटका केली आहे.