Pune : क्राईम ब्रँचच्या ‘प्रॉपर्टी सेल’च्या माजी पोलिस निरीक्षकाचे रश्मी शुक्ला यांच्यावर खळबळजनक आरोप, धनंजय धुमाळ म्हणाले – ‘पोलिस अधिकारी सुनिल पवार, अरूण सावंत यांच्यासह इतरांची चौकशी व्हावी’ ! ‘त्या’ पोलिसांच्या मालमत्तेबाबत उपस्थित केले प्रश्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत असणाऱ्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर पुन्हा आरोप झाले असून, पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या नावे खंडणी मागितल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले माजी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चार वर्षानंतर त्यांची बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी पैसे मागितल्याची माझ्याविरुद्धची तक्रार खोटी असून शासन व माध्यमांनी माझी बाजू ऐकून न्याय द्यावा. तसेच या प्रकरणी षड्यंत्र करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसहित रॅकेट मधील सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

माजी पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी याबाबतचे निवेदन पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवले आहे. याबाबत त्यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांचे वकील ऍड. रमेश जाधव उपस्थित होते. धनंजय धुमाळ म्हणाले, तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने संदीप जाधव यांच्याकडून २५ लाख मागितल्याच्या खोट्या आरोपाखाली माझ्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्याप्रकरणी मला निलंबीत करण्यात आले. पण, यात देण्यात आलेले ऑडियो, व्हिडीओ रेकोर्डिंग पुरावे हे बनावट व फेरफार केलेले होते. मात्र, मूळ रेकोर्डिंग ज्या स्पाय कॅमेरा, इलेक्ट्रोनिक साधनांचा वापर करून केले होते, तो मूळ पुरावा प्राथमिक चौकशी अधिकारी यांनी न मिळवता बनावट रेकॉर्डिंगच्या आधारावर चौकशी केली आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली. संदीप जाधव यांनी हे रेकॉर्डिंग (दि. 20/07/2016 रोजी केले होते. ते 02/08/2016 रोजी पर्यंत) स्वतकडे ठेवले. त्यात आवश्यक ते फेरबदल केले आणि त्यानंतर ते प्रसारमाध्यमात व पोलीस आयुक्त यांना दिले असल्याचा आरोप देखील धनंजय धुमाळ यांनी केला आहे.

आताही पुन्हा बातम्या प्रसारित केल्या जात असून यामुळे माझी, कुटुंबियांची, महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी होत आहे. तसेच, माझी अपिलीय सुनावणी लवकर करण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पण, कोविडमुळे तो वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे नाईलाजाने मला स्वतःला प्रसार माध्यमांद्वारे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. तसेच बनावट तक्रारीअर्ज व बनावट सीडीज हे पुरावे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीच तयार करून संदीप जाधव यांना दिले असून, त्याची खात्रीशीर माहिती समजली असल्याचे धनंजय धुमाळ यांनी यावेळी सांगितले आहे.

बाणेर, बालेवाडीतील सर्व सामान्य लोकांच्या जमीनीवर काही पोलिसांच्या मदतीने संदीप जाधव व हेमंत गांधी आणि साथीदारांनी मारलेले बेकायदेशीर ताबे याबाबत केलेल्या तक्रारी बाबतीत संबंधित पोलिस स्टेशनकडून योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्याने आजही न्याय मिळालेला नाही असे धनंजय धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

प्रत्यक्षात मी शिशिर कोशे यांच्या जमीनीवर संदीप जाधव आणि हेमंत गांधी यांनी पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर ताबा मारल्याच्या आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करीत होतो. संजय मुथा यांच्या कागदपत्रांचा वापर करून 30 वर्षापुर्वी टाटा मोटर्स कंपनीच्या लोकांनी घेतलेल्या जमिनीवर संदीप जाधव, हेमंत गांधी यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने जमिनींचा ताबा बेकायदेशीर रित्या घेतला होता. त्यातील एक प्लॉट हा तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आपल्या पत्नीच्या नावावर संदीप जाधव व हेमंत गांधी यांच्याकडून घेतला. त्या जमिनीची सरकारी किमत 90 लाख तर बाजारभावा प्रमाणे किमत ४ ते ५ कोटी रुपये होती याचीही चौकशी करावी, अशी मागणी धनंजय धुमाळ यांनी केली आहे.

शिशिर कोसे यांच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार संदीप जाधव, हेमंत गांधी यांची मी चौकशी करीत होतो. यावेळी २०१६ साली मी पुणे शहर गुन्हे शाखा (प्रॉपर्टी सेल ) येथे कार्यरत होतो. त्यामुळे आकसाने चौकशी दरम्यान झालेल्या चर्चेचे संदीप जाधव यांनी बनावट रेकॉर्डिंगचे पुरावे सादर केले. यात तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार, अरुण सावंत, सुरेश मिरगे यांच्या सहभागाची देखील चौकशी व्हावी असं धनंजय धुमाळ म्हणाले.

जीवितास धोका

पुणे पोलीस आयुक्त व सहआयुक्त यांना महिन्याभरापूर्वी भेटून आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाची माहिती दिली आहे. कारवाईची मागणी केली होती. तसेच मला खोट्या गुन्ह्यात गोवणाऱ्या संदीप जाधव, इतरांकडून जीवितास धोका असल्याची कल्पना दिली,अशी माहिती धनंजय धुमाळ यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

चौकशीची धुमाळ यांनी केली मागणी

संदीप जाधव हे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संपर्कात आहेत. जाधव पोलिसांच्या संपर्कात येण्यापूर्वी काय करीत होते, याची चौकशी करावी. जाधव हे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या बेहिशोबी पैसा आणि जंगम मालमत्तेबाबतची कामे करतात. त्यामुळेच काही वर्षात ते करोडो रुपयांचे मालक झाले. ते कसे करोडेचे मालक झाले या बाबतची योग्य त्या शासकीय यंत्रणे कडून चौकशी करावी. यानंतर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील.