Pune : पार्किंगमध्ये पेट्रोल चोरताना पकडलं, चौघांकडून कुटुंबावर सपासप वार, बिबवेवाडीत महिलेसह तिघे गंभीर जखमी, प्रचंड खळबळ
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पार्किंग केलेल्या दुचाकीमधून पेट्रोल चोरताना पकडल्यानंतर चौघांनी कुटुंबावर सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी भागात घडला आहे. यात महिलेसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री तिघांपैकी दोघांना नागरिकांनी पकडले. एकजण पसार झाला. त्याला बोलवण्यास सांगितल्यानंतर तो साथीदारासोबत आला आणि त्याने तिघांवर वार केले.
तुषार पोपट फडतरे (वय 29), पोपट बाबुराव फडतरे (वय 55) व सुनीता फडतरे (48) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तुषार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हे आई – वडिलांसोबत विद्या निकेतन शाळेजवळ पुरंदर निवास येथे राहतात. त्यांचे दोन मजली घर आहे. त्यांच्या इथे भाडेकरू देखील राहतात. दरम्यान रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना पार्किंग केलेल्या दुचाकींचा आवाज आला. संशय आल्याने त्यांनी पाहिले असता त्यांना तिघेजण पेट्रोल काढत असताना दिसून आले. त्यामुळे भाडेकरू व फिर्यादी यांनी त्यांना पकडले. यात दोघांना पकडले. पण एकजण पसार झाला. यावेळी त्यांनी त्या दोघांना त्याला बोलव अन्यथा पोलिसांना बोलवू असे सांगितले. यावेळी त्यांनी साथीदाराला फोन करून बोलावले. पण तो येताना आणखी एकासोबत हत्यार घेऊन आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या आई- वडिलांवर घातक शस्त्राने सपासप वार केले. यावेळी त्यांनी परिसरात मोठा गोंधळ व दहशत माजवत तेथून पसार झाले.
यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले. बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषार यांच्या आईवडिलांना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.