चिंताजनक ! पुण्यातील ससून रूग्णालयात ‘कोरोना’मुळं आणखी चौघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं शहरात चांगलच थैमान घातलं आहे. आज दिवसभरात शहरात कोरोनामुळं चौघांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनामुळं होणारे मृत्यू आणि कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही पुणेकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.


ससून रूग्णालयात उपचार चालू असलेल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 3 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. वाकडेवाडी येथे राहणारी 65 वर्षीय महिला, गंजपेठेतील 54 वर्षीय पुरूष, कोंढव्यातील 47 वर्षीय आणि गुलटेकडी येथील 55 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या आणि कोरोनामुळं होणारे मृत्यू ही अतिशय चिंतेची बाब आहे. यापुर्वीच प्रशासनानं पुणे शहरातील काही परिसर सीलबंद केला आहे. मुंबई आणि पुणे ही दोन शहरे कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. आज पुण्यात मृत्यू झालेल्या चौघांना देखील कोरोनाव्यतिरिक्त इतर देखील आजार होते असं देखील सांगण्यात आलं आहे.