Pune : ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणार्‍या तरूणीसह चौघांना अटक; इंजेक्शन 37 हजारांना विकणार होते, खडकी परिसरात कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार तेजीत सुरू असून, इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या तरुणीसह चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. 37 हजार रुपयांना ते इंजेक्शन विक्री करणार होते, असे सांगण्यात आले आहे. खडकीतील गुरुद्वारा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

निकिता गोपाळ ताले (वय 25, महात्मा फुले नगर भोसरी), राहुल बाळासाहेब वाळुंज (वय 22, अमित अपार्टमेंट, चाफेकर चौक, चिंचवड), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय 20) आणि प्रतीक गजानन भोर (वय 26, तूपुर कॉम्प्लेक्स उत्सव हॉटेल समोर मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी जयश्री सवदती यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी काहीजण येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तब्बल या माहितीची खातरजमा केली. त्यानुसार हे 37 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याच्या तयारीत होते. यावेळी निकिता हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्याकडे चौकशीत करण्यात आली. त्यावेळी इतर आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार त्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.