Pune : मुलाला मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेला चार महिलांकडून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाला मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेला चार महिलांनी बेदम मारहाण केली. बॅट व लोखंडी रॉडने या चौघीनी तिला मारले आहे. कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे हा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अस्मा शेख व इतर तीन अश्या चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या लहान मुलाला यातील एका आरोपी महिलेच्या मुलाने मारहाण केली होती. त्यामुळे त्या त्याचा जाब विचारण्यास गेल्या होत्या. मात्र, मारहाण का केली असे विचारल्याचा राग मनात धरून आरोपी महिलेने आणि अन्य तीन महिलांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.

दाम्पत्याला मारहाण
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास चाललेल्या दाम्पत्याला अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर येथील कुंजीरवाडी येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विष्णू भगवान नरके (वय ४५) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण बाबूराव सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या कुटुंबाला शिवीगाळ करून ‘बार्शीकर तुम्ही जाहीर माफी मागा’ असे बजावले. त्याबाबत फिर्यादी आणि त्यांची पत्नी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी दुचाकीवरून चालले असताना, आरोपीने आणि त्याच्या भावाने फिर्यादीची दुचाकी अडवून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. तर, फिर्यादीच्या पत्नीला हाताने मारहाण केली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलिस पुढील तपास करत आहेत.