Pune : लकी ड्रॉमध्ये निवड झाल्याचे सांगत 2.5 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लकी ड्रॉमध्ये तुमची निवड झाल्याचे सांगत एका व्यक्तीची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने स्नॅपडील वेबसाईटवरून खरेदी केल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी 52 वर्षीय व्यक्तीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे औंध परिसरात राहण्यास आहेत. त्यांनी स्नॅपडील वेबसाईटवर औषधे खरेदी केली होती. त्यानंतर त्यांना आरोपींनी फोन केला. औषधे खरेदी केलेल्या व्यवहारामध्ये ते लकी ड्रॉसाठी निवडले गेले असल्याचे त्यांना सांगितले. त्यासाठी त्यांना वेगवेगळी आमिषे दाखविली. त्या सुविधा मिळविण्यासाठी त्यांना अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यास फिर्यादी यांनी तयारी दाखविली असता, त्यांना आरोपींनी एका बँकेचा खाते क्रमांक पाठविला. त्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी प्रथम काही रक्कम पाठविली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैसे भरायला लावले. फिर्यादी यांनी त्यांना ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान तब्बल 2 लाख 52 हजार रुपये पाठविले. तरीही त्यांना आणखी पैसे पाठविण्यास सांगत होते. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलीस तपास करत आहेत.