Pune : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे चार लाखाची फसवणूक; महिला पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका महिलेची आणि तिच्या दोन नातेवाईकांची शहर पोलीस दलातील एका महिला कर्मचार्‍याने साडे चार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साडेसात लाख घेतले होते. पण, त्यातील काही पैसे परत दिले होते. 2018 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

आदिती उर्फ विद्या दिपक साळवे (रा. खडकी बाजार, पोलीस वसाहत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सुवर्ण विठ्ठल येनपुरे (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती साळवे या महिला पोलिस शिपाई आहेत. सध्या त्या हडपसर पोलिस ठाण्यात महिला नेमणुकीस आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्या कबडीपट्टू देखील आहेत. तर आदिती या देखील कबडीपट्टू असून यादरम्यान त्यांची एका दुसऱ्या मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती.

अदिती यांची ओळख झाल्यानंतर अदिती यांनी फिर्यादी व त्यांची लहान बहीण व मावशी बहिण यांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक पदावर नोकरी लावून देते, असे सांगत आमिष दाखवले. त्यांना पालिकेत नातेवाईक नोकरीस असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. पण, त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगत त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर ही नोकरी लावली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी पैसे परत मागितले.

सतत पैसे मागत असल्याने आदिती साळवे यांनी तीन लाख रुपये परत दिले. पण, परंतु उर्वरित साडेचार लाख रुपये अद्याप परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोळी हे करत आहेत.