Pune : MBA ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 65 लाखांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नामांकित महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून एमबीएला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ६५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी कुणाल अजय जिंदाल (वय २१, रा. हडपसर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंबर अनीष चॅटर्जी, अयान अनीष चॅटर्जी, आरती मनीष चॅटर्जी व इतरांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल व अंबर हे वर्गमित्र आहेत. कुणाल याला एमबीएला प्रवेश हवा होता. अंबर याच्या माध्यमातून आपी अयान याच्यासोबत फिर्यादी तरुणाची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने लवळे येथील महाविद्यालयात ओळख असल्याचे सांगितले. तसेच एमबीएला मॅनेजमेंट कोट्यातून सहज प्रवेश मिळवून देतो, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट इमेल आयडी व एका लिंकवरून कॉलेजच्या नावाने बनावट मेल पाठवून त्यात कॉलेजला प्रवेश मिळाल्याची कागदपत्रे पाठविली. त्यासाठी आरोपींनी स्वतःच्या खात्यावर वेळोवेळी पैसे घेतले. कॉलेजच्या नावाने प्रवेश शुल्काच्या बनावट पावत्या तयार करून त्यांना पाठविल्या. तरुण व त्यांच्या मित्राकडून ६५ लाख ६९ हजार रुपये घेतले. पण, त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे तरुणाने पैसे परत मागितले. पण, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. आरोपांना कोथरूड परिसरात पैसे दिले होते. त्यामुळे त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.