पुण्यात ‘या’ ठिकाणी मोफत ‘डोसा’ ; उपकारांची जाण ठेवत तरुणाची काकांना अनोखी श्रद्धांजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खरंतर सध्याच्या महागाईच्या जमान्यात काहीही फुकट मिळत नाही. त्यातही ज्यांचं हातावरचं पोट, त्यांना दिवसभराची कमाई फार मोलाची असते. पण पुण्यातल्या टिळक रोड वरील न्यु इंग्लिश स्कुल समोर असणाऱ्या डोसा सेंटरच्या नाईक मालक बंधूंनी आपल्या काकांनी केलेल्या मदतीची आठवण जपलीय. ‘ओम साई डोसा सेंटर’चे मालक अभिजित नाईक आणि मनोज नाईक यांनी २०११ साली आपले छोटा डोसा सेंटरचा व्यवसाय चालू केला होता. त्यावेळी त्यांचे चुलत काका अरुणराव किसनराव काळे यांनी खूप मदत केली होती. काळे यांचे २२ मे २०१८ रोजी निधन झाले होते. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण म्हणून , त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून नाईक बंधू यांनीआज डोसा सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना डोसा मोफत देत आहेत.

खडतर सुरुवात
या डोसा सेंटरचे मालक अभिजित यांनी ‘पोलीसनामा’शी बोलताना संगितले की, “२०११ साली मी या ठिकाणी माझा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले त्यावेळी खरतर या जागी खाऊ गल्लीत नव्हतीच. त्यावेळी याठिकाणी कचरा टाकला जात होता मात्र ही जागा स्वच्छ करून मी छोट्या हातगाडीवर डोसा विकायला सुरुवात केली. यावेळी माझ्या खडतर प्रवासात माझे काका अरुणराव काळे यांनी मला खूप मदत केली होती. त्यानंतर व्यवसाय चालायला लागला. आज मी आणि माझे बंधू , माझी पत्नी पूनम येथे व्यवसाय करतो. माझ्या डोसा सेंटरची मी शासनाकडून नोंदणी करून घेतली. आज जर माझ्या काकांनी मला मदत केली नसती तर मी व्यवसाय करू शकलो नसतो ” त्यांचीच आठवण म्हणून मी आज माझ्या ग्राहकांना मोफत डोसा देतो आहे”.

नाईक बंधू यांचा हा डोसा विकण्याचा व्यवसाय जोमात सुरु आहे.अभिजित नाईक आणि त्यांचे कुटुंब मूळचे पुण्यातील शुक्रावर पेठेतील आहे. अभिजित यांचे इयत्ता १०वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. एरव्ही आजच्या महागाईच्या काळात अवघ्या १० रुपयात यांच्याकडे डोसा दिला जातो. शालेय विद्यार्थीं , जवळच ज्ञानप्रबोधिनी येथे अभ्यासिकेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची येथे नेहमीच रीघ असते. तसेच याठिकाणी स्वच्छतेची देखील काळजी घेतली जाते. आज अभिजित यांच्या पत्नी पूनम नाईक देखील त्यांना मोलाची साथ देतात.