पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबत नसून चतुःश्रुंगी भागात चोरट्यांनी सलग दोन दिवस घरफोड्या करत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे यावरून पहायला मिळत आहे. दरम्यान घर बंद होताच चोरटे घरे फोडत असल्याने पुणेकर हवालदिल झाले आहेत. गेल्या १० महिन्यांत शहरात सव्वा चारशे घरफोड्या झाल्या आहेत. यात कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

अमर जिरोळे (वय ४६) यांचा पाषाण-सुस रस्त्यावर माउंट व्हर्ट आल्टिस इमारतीत फ्लॅट आहे. दरम्यान ते २३ नोव्हेंबर रोजी सकाळी कामाच्या निमित्ताने फ्लॅट बंद करून गेले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने बनावट चावीने त्यांचा फ्लॅट उघडून आत प्रवेश केला. तसेच बेडरूममधून रोख ४५ हजार रूपये व सोन्याचे दागिने असा ५ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी हे दुपारी तीनच्या सुमारास घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. फ्लॅटची व कपाटाची चावी दोन महिन्यांपूर्वी हरवली होती. ती चावी त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला सापडली होती. त्यानंतर तिने पंधरा दिवसांनी काम सोडले. त्यामुळे तिने बनावट चावीने घरफोडी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तर दुसरी घटना ब्रेहमन चौकातील नियोनी पार्क येथे घडली आहे. याप्रकरणी किशोर रामजी साखरकर (वय ६०) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. ते रविवारी सकाळी कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यांना सोमवारी पहाटे सुरक्षारक्षकाने फोन करून त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा सव्वा लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी चतुश्रुंगी पोलिसांना घटनेची माहिती दिली. चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बंद फ्लॅट फोडून तब्बल साडेसहा लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत.

Visit : Policenama.com