Pune : अखेर दफनविधीची 28 लाख रुपयांची निविदा रद्द !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे मरण पावलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्‍चन समाजातील नागरिकांचे दफनविधी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काढलेली 28 लाख रुपयांची निविदा अखेर रद्द केली. काही सामाजिक संघटना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मोफत दफनविधी करत असताना महापालिकेने याच कामासाठी २८ लाख रुपयांची निविदा काढल्याने शिवसेनेनसह विविध संघटनांनी महापालिका ‘मढ्याच्या टाळूवरील लोणी खात ‘ असून निविदा रद्द करण्याची मागणी केली होती.

शहरातील कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक पुढे येत नसल्याने काही सामाजिक संस्थांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली होती. विशेषतः मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या मृतांचे दफनविधी धार्मिक पद्धतीने व्हावेत आणि त्यांचे ज्वलन होऊ नये याकरिता सामाजिक संस्था पुढे आल्या होत्या. सुरुवातीच्या काळात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संस्थेकडून दफनविधी केले जात होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पीएफआय या संघटनेवर आरोप केल्यानंतर मुंबई प्रमाणेच पुणे महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी या संस्थेचे काम थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अल्फा ओमेगा ख्रिश्चन संस्था महासंघ आणि उम्मत सोशल फाऊंडेशन या संघटनांनी अनुक्रमे मृत ख्रिश्‍चन आणि मुस्लिम नागरिकांचा दफनविधी करण्याची जबाबदारी घेतली. यासाठी केवळ पीपीई किट व तत्सम सुरक्षा साधनांव्यतिरिक्त कुठल्याही आर्थिक मोबदल्याशिवाय या संघटना मागील चार महिन्यांपासून कोरोना बाधितच नव्हे तर अन्य मृतदेहांचे दफनविधी करत आहेत.

या संस्था दफनविधीचे काम करीत असताना पालिकेने त्याच कामासाठी आरोग्य विभागाकडून तब्बल २८ लाखांची निविदा काढल्या आहेत. जे काम मोफत होत आहे त्या कामासाठी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. या विषयावरून सामाजिक संस्था संतापल्या असून प्रशासन करदात्या पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप केला जात आहे. उम्मत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जावेद खान यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्ही मोफत काम करीत असून यापुढेही करण्यास तयार आहोत असे प्रशासनाला कळविले आहे. या प्रकाराचा बंधुभाव भाईचारा फाऊंडेशनकडून निषेध करण्यात आल्याचे अध्यक्ष शब्बीर शेख यांनी सांगितले. या सर्व प्रकरणावरून शिवसेना आक्रमक झाली असून महापालिका प्रशासन पुणेकरांचा पैसा उधळत असून हे प्रकार थांबले पाहिजेत तसेच ही निविदा तात्काळ रद्द झाली पाहिजे अशी मागणी केली होती. तर आज मुस्लिम मुल निवासी विचार मंच आणि ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्ट ने अंजुम इनामदार, सगई नायर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करत निविदा रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनामध्ये काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख आदी सहभागी झाले होते. या निविदेला वाढता विरोध लक्षात घेऊन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

आवाहन करणार

कोरोना मुळे मरण पावलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांच्या मृतदेहांचे दफनविधी करण्याची निविदा रद्द करण्यात आली आहे. आणखी काही संघटना सामाजिक दायित्व म्हणून मृतदेहांचा दफनविधी करण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जाहीर निवेदन देऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थांना आवाहन करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या संस्थांना विभागवार जबाबदारी देण्यात येईल, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.