पुण्यातील मानाच्या गणपतींसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यात मुंबई आणि पुणे या औद्योगिक महानगरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, गणोशोत्सव जवळ आला असून, त्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. अशावेळी प्रशासनाने एक पाऊल मागे घेत रस्त्यावर मंडप न टाकण्याची भूमिका बदलली आहे. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींना मंडप घालण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मानाच्या पाचही गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्याची भूमिका घेतलेली. पण ते शक्य नसल्याचं कारण देत गणपती मंडळे मंडप टाकण्याच्या भूमिकेवर अडून बसले होते. शेवटी प्रशासनासोबत तडजोड केल्यावर आज पाचही मानाच्या गणपतीसाठी मंडप टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी पुण्यातील ५० गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा गणेशोत्सवात मंडप न घालण्याचा मोठा निर्णय जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुण्याच्या मंडळांनी सामाजिक भान राखण्याची भूमिका घेतली आहे. याआधी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकीत गणेश मूर्तीच्या उंचीवर आणि उत्सवावर काही नियम घालून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील सुमारे ५० मोठ्या गणेश मंडळांनी एकत्र येत रस्त्यावर मंडप न घालण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्षभर एका छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून, त्यासाठी मंडळाचे पाच कार्यकर्ते रोजची आरती, प्रसाद, पूजा या गोष्टी करतील.