Pune : कोरोना महामारीतही वडकीमध्ये वृद्धांना सांभाळणाऱ्या गंगा-तारा

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन-  कोरोना महामारीच्या भीतीने प्रत्येकजण संकटात सापडला आहे. कोरोना महामारीमध्ये स्वतःच्या कुटुंबीयांना दूर लोटणाऱ्यांची कमी नाही. मात्र, महामारीच्या संकटात वडकीनाला (ता. हवेली) येथे गंगा-तारा वृद्धाश्रम सुरू करून वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या गंगा-तारा (नीता भोसले आणि अॅड. लक्ष्मी माने) यांचे कार्य कौतुकास्पदआहे. महामारीमध्ये वृद्धांना मायेचा घास देत आपलेपणाने सांभाळत तिरस्कार करणाऱ्या मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना वृद्धाश्रमाच्या उद्घाटनासाठी बोलावले, त्यावेळी त्यांनी उद्घाटनासाठी नाही मात्र वृद्धाश्रम बंद करण्यासाठी नक्की येईल, अशा स्पष्ट शब्दात सुनावल्याची आठवण न्यायाधीश किरण चक्रनारायण यांनी करून दिली.

वडकीनाला (ता. हवेली) येथे गंगा-तारा शिवापूरकर वृद्धाश्रम येथे दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम, वेंकीज फाउंडरच्या मेघा शर्मा यांनी भेट दिली. याप्रसंगी शान सर, के. के. डिजे, किरण ठोंबे, लहू लांडगे, अजय वंदगल, मार्टिन जोसेफ उपस्थित होते. यावेळी राजू लांडगे यांनी ऑक्सिजन निर्मिती करणारी 29 वृक्षांसह दोन हापूस आंबांच्या पेट्यांची भेट दिली.

ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागला आहे. त्यामुळे वृद्धांची कुचंबना होत आहे, अशा परिस्थितीत, त्यांना सांभाळ करत मायेची फुकंर घालण्याचे काम गंगा-तारा वृद्धाश्रमात केले जात आहे, याची समाजाने दखल घेतली पाहिजे. वृद्धाश्रम नव्हे, आनंदाश्रम असे नामकरण करावे आणि महत्त्वाचे म्हणजे वृद्धाश्रमापर्यंत कोणाला यायची वेळ येऊ नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बेवारस वृद्धांसाठी कुठे तरी आधार असला पाहिजे, याबाबत दुमत असायचे कारण नाही. त्यांच्यासाठी वृद्धाश्रम असणे काही गैर नाही. मात्र, अलिकडे वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ केला जात नाही, त्यांना वृद्धाश्रमात पाठविले जाते, ही बाब निश्चितच अशोभनीय आहे. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही ज्या देशात राहतो, जगतो, तिथे दारू घरपोच मिळते. मात्र, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाही, ही बाब लाजीरवाणी आहे, असे मत दलित पँथरचे अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांनी व्यक्त केले.

गंगा-तारा वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा नीता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिव अॅड. लक्ष्मी माने यांनी आभार मानले.