गँगस्टर छोटा राजनच्या पुतणीकडून व्यावसायिकाला 50 लाखाच्या खंडणीची मागणी, शूटर 25 लाख घेताना पोलिसांच्या ट्रॅपमध्ये अडकला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुविख्यात गँगस्टर छोटा राजणच्या पुतणीने व्यावसायिकाला 50 लाखाची खंडणीची मागणी करत त्यांना पिस्तूलामधील दहाच्या दहा गोळ्या झाडण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. खंडणीचा पहिला हप्ता म्हणून 25 लाख घेताना शूटरला पोलिसांनी रंगेहात पकडले.

धीरज बाळासाहेब साबळे (वय 25, रा. मुपो. धानोरे, ता. खेड) असे अटक केलेल्या शूटरचे नाव आहे. तर, पुतणी प्रियदर्शनी निकाळजे (रा. वानवडी), मंदार वायकर (रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात राजेश जवळेकर (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या दुसर्‍या पत्नी व मेहुणी यांच्यात घरघुती कारणावरून वाद सुरू आहेत. ते राहण्यास कात्रज भागात आहेत. दरम्यान छोटा राजन याची पुतणी प्रियदर्शनी ही एका महिला संघटनेची अध्यक्षा आहे. ती फिर्यादींकडे आली. तिने पत्नी व मेव्हुणीने तुमची तक्रार माझ्या केली आहे. त्यानुसार, मी माझ्या लेटरहेडवर भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात तक्रार अर्ज दिला असल्याचे सांगितले.

तसेच, गुन्हा दाखल करायचा नसेल तर, 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील 25 लाख मी घेणार असून, उर्वरित 25 लाख पत्नी, मेव्हुणी व मंदार याला देणार असल्याचे सांगितले. खंडणी न दिल्यास हातातील पिस्तूल काढून ते फिर्यादींवर रोखत 50 लाख व पत्नीला घटस्फोट न दिल्यास पिस्तूलामधील 10 च्या दहा गोळ्या घालुन तुला मारून टाकेल अशी धमकी दिली. मी छोटा राजनची सख्खी पुतणी आहे. जिव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अशा धमक्या देऊन वारंवार खंडणीची मागणी केली.

याबाबत त्यांनी खंडणीविरोथी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, शुक्रवारी रात्री धीरज याला खंडणीचा पहिला हप्ता म्हणून 25 लाख घेतना पोलिसांनी लष्कर परिसरातील आरोरा टॉवर जवळ अटक केली. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.