Pune : वारजे माळवाडीमधील गुंड गंग्या उर्फ विकी आखाडे वर्षासाठी स्थानबध्द, येरवडा जेलमध्ये रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  वारजे माळवाडी परिसरातील गुंड गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडेवर (वय 24) एमपीडीएनुसार कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार एमपीडीएनुसार 19 वी कारवाई ठरली आहे.

गंग्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, शस्त्र बाळगणे, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीमुळे वारजे माळवाडीकर दहशतीखाली होते. त्याच्याविरोधात तक्रार देण्यास देखील नागरिक घाबरत.

कायदा व सुव्यवस्था तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी गंग्याविरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार त्याची छाननी करत त्यांनी तो प्रस्ताव अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवला. त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदनाखाली एमपीडीए कारवाईचे आदेश देत त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.