Pune : देवाची उरूळी कचरा डेपोच्या प्रश्‍नामुळे शहरात साचू लागले कचर्‍याच्या ढीग, तुंबताहेत पावसाळी गटारे आणि ड्रेनेज लाईन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये मिश्र कचरा टाकण्यास स्थानीक ग्रामस्थांनी विरोध केल्याने शहरामध्ये कचर्‍याचे ढीग साठू लागले आहेत. अशातच शहरात जोरदार पाउस सुरू असल्याने हा कचरा गटारे आणि नाल्यांमध्ये अडकत असल्याने ठिकठिकाणी चेंबर्स ओव्हरफ्लो होउन रस्त्यांना गटारांचे स्वरूप आले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार डिसेंबर २०१९ मध्ये देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये कचरा डंपिंग बंद करण्यात आले आहे. परंतू कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काम सुरू असल्याने महापालिकेने येथील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये प्रक्रियेसाठी मिश्र कचरा पाठविण्यास सुरूवात केली. दोन महिन्यांसाठी ग्रामस्थांनी याला मंजुरी दिली होती. परंतू यानंतर कोरोनाची साथ फैलावू लागल्यानंतर नवीन प्रकल्पांचे कामही जवळपास बंद पडल्याने महापालिकेने ग्रामस्थांसोबत चर्चा करून आणखी मुदत वाढवून घेतली. मात्र, अनलॉक झाल्यानंतरही प्रकल्प सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी २२ ऑगस्टपासून डेपोमध्ये येणार्‍या कचर्‍याच्या गाड्या अडविण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून लॉकडाउनमुळे कचर्‍याचे प्रमाण कमी असल्याने कचर्‍याचे प्रमाण कमी झाले होते. हा कचरा अन्य प्रकल्पांमध्ये प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत होता. परंतू आता मागील महिन्यापासून कचर्‍याचे प्रमाण वाढू लागले आहे. हा वाढलेला कचरा हडपसर येथील दीशा प्रकल्पाच्या आवारातील मोकळ्या जागेवर साठविण्यात येत आहे. परंतु तेथील क्षमताही संपल्याने कचरा साठवायचा कोठे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या रॅम्पवर कचरा साठू लागला आहे. तर रॅम्पच्या जागा लहान असल्याने नवीन कचरा गोळा करण्यास जागा राहीली नाही. यामुळे नागरिकांकडून कचरा गोळा करण्यास टाळंमटाळ केली जात आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेवर कचर्‍याचे ढीग दिसू लागले आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात धुव्वांधार पाउस पडू लागल्याने इतस्त: पसरलेला कचरा वाहून नाले, पावसाळी गटारांमध्ये अडकत आहे. परिणामी पावसाळी गटारेही तुंबून रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत आहेत. काही ठिकाणी पावसाळी गटारे मैलापाणी वाहून नेणार्‍या वाहीन्यांना जोडल्याने मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर येउ लागले आहे. यामुळे लेप्टोपायरसीस सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये जानेवारीपासून कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. येथील बायोमायनिंगच्या प्रकल्पामध्ये कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने कचरा डेपोमध्ये प्रक्रिया न होणारे रिजेक्ट टाकण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार अन्य प्रकल्पात निर्माण होणारे रिजेक्ट डेपोमध्ये टाकले जात आहे. स्थानीक ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली आहे, तसेच पुन्हा पत्रही पाठविणार आहे. तसेच कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी नवीन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

– मुरलीधर मोहोळ, महापौर , पुणे महापालिका.