Pune : श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना संपन्न ! मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल आणि सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते आज ( शनिवारी ) सकाळी विधीवत करण्यात आली.

यानिमित्त श्री लक्ष्मीमातेचा शृंगार करण्यात आला. महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. दंडवते गुरुजी आणि शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले. विविध रंगी फुलांनी मंदिर सजविण्यात आले असून विद्युत रोषाणाई केली आहे.

शासकीय आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल उपस्थित होते.

आई, देवीमाते तुला प्रथम वंदन करून कार्याचा प्रारंभ करीत आहे. मानवजातीवर आलेल्या कोरोना साथीच्या संकटाचे निवारण कर, अशी प्रार्थना आबा बागुल यांनी केली

नवरात्र उत्सवात दरवर्षी साजरा होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिला महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात पूजाअर्चा, अभिषेक ,आरती आदी धार्मिक कार्यक्रम होतील, असे बागुल यांनी सांगितले.

पुणे नवरात्रौ महोत्सवात अनेक कलाकारांना दाद देण्याची संधी मिळते. यंदा साथीमुळे कलाकारांना संधी देता आली नाही. मात्र, पुढील वर्षी अधिक उत्साहात उत्सव साजरा करू, असे बागुल म्हणाले.

यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध असून भाविकांनी श्री लक्ष्मीमातेचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने घ्यावे असे आवाहन बागुल यांनी केले आहे.