Pune : कोरोना महामारीमध्ये गरजूंना मदतीचा हात द्या; शिवसेनेच्या हडपसर विधानसभा समन्वयक विद्या होडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. उद्योग, व्यवसाय आणि कंपन्यांची कामे मंदावली आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गंडांतर आले आहेत. रोजंदारीने काम करणारांच्या हाताला काम नाही, त्यामुळे दाम नाही अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हिंमतीने प्रसंगाला सामोरे जात त्यावरही विजय मिळवू. कोरोनावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे कोरोनावरही आपण नक्कीच मात करू, असा विश्वास शिवसेनेच्या हडपसर विधानसभा समन्वयक विद्या होडे यांनी व्यक्त केला.

शिवसेना हडपसर विधानसभा समन्वयक प्रा विद्या संतोष होडे व सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर (सातववाडी) येथील महात्मा फुले वसाहतीमधील 100 गरजूंना अन्नधान्य कीट दिले. याप्रसंगी सुहास पडवळ, हेमंत मस्के, अल्ताफ शेख, अरविंद कांबळे, प्रदीप महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.

होडे म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या आजाराने रौद्र रूप धारण केले आहे. शासकीय-निमशासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. ऑक्सिजन बेड आणि रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. मागिल वर्षभरापासून रोजगार नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होत आहे. त्यात उपचारासाठी लाखोंचा खर्च कसा करायचा असा प्रश्न असून, दररोजच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्याची चिंता मजूरवर्गाला भेडसावत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे भान ठेवून गरजूंच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकून अन्नधान्यरूपी छोटीशी मदत देण्याची गरज आहे. आपल्या परिसरातील गरजूंना आधार आणि मदतीचा हात देणे हीच खरी माणुसकी आहे, या भावनेतून खारीचा वाटा उचलून 100 कुटुंबांना अन्नधान्याचे कीट देण्यात आले. असे त्यांनी स्पष्ट केले.