Pune : विकासकामांना गती द्या, भाजपचे आयुक्तांना साकडे

पुणे : सव्वा वर्षाने महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विकास कामे पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी भाजपची लगबग उडाली आहे. विकास कामांना गती द्या, असे साकडे भाजपच्या बैठकीत आयुक्त विक्रम कुमार यांना घालण्यात आले .

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, स्थायिक समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह पक्षाचे ७३ नगरसेवक उपस्थित होते. आयुक्तांसह खातेप्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते.

कोरोनाच्या साथीमुळे विकास प्रकल्प आणि वॉर्डातील कामे लांबणीवर पडली आहेत त्यांना गती द्यावी. भामा आसखेड पाणी योजनेचे काम लवकर पूर्ण करावे, समान पाणी पुरवठा योजनेला वेग द्यावा, कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, नाले साफसफाई, उड्डाणपूल रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, वॉर्डस्तरीय कामांना मंजुरी द्यावी अशा सूचना मुळीक यांनी केल्या. विकास कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.