Pune : सोनसाखळी आणि वाहने चोरणार्‍या सराईतास विश्रांतवाडी पोलिसांकडून अटक, 7 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    शहरात सोनसाखळी व वाहन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला फक्त झर्किन आणि हेल्मेट घालन्याच्या पद्धतीवरून अटक केली आहे. त्यासाठी 250 सीसीटीव्ही तपासले आहेत. त्याच्याकडून 7 लाख 13 हजार रुपये किंमतीच्या 5 सोनसाखळी व 6 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला देखील पकडले आहे.

रूपेश प्रकाश यादव (वय ३६, रा. वडगाव शेरी, मूळ-संभाजीनगर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. हलीम अलीम शेख (वय ४०, रा. सय्यदनगर, हडपसर ) या सोनाराला पोलिसांनी जेरबंद केले.

विश्रांतवाडीत येथील भाजी मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली होती. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी कैद झाला होता. त्याची माहिती घेत असताना याच आरोपीने चंदननगर, अलंकार, विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी सापळा रचून रूपेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शहरातील विविध भागातून ५ सोनसाखळी आणि ६ वाहने चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोने तो हलीमला विक्री करीत असल्याचे सांगितले. चोरी करण्यासाठी रूपेश एकाच प्रकारचे जर्विंâग आणि हेल्मेट घालत असल्याची बाब पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, अझरुद्दीन पठाण, रिहान पठाण, किशोर दुशिंग, उत्तम गट, संदीप देवकाते, शेखर खराडे, अनिकेत भिंगारे, सतीश मुंडे, विशाल गाडे, विनोद महाजन, संजय आढारी, प्रवीण भालचिम, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.

आंतरजिल्हा वाहनचोरी करणारे दोघे अटकेत

आंतरजिल्ह्यातील वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. रमेश लक्ष्मण चव्हाण वय २१ आणि मोहन एकनाथ निलवर्णे वय २० अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने केली.