Pune : महापालिकेच्या नगरसचिव पदासाठी शासकिय अधिकारी ? प्रशासनाची राज्य शासनाला ‘विनंती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे महापालिकेचे नगरसचिव सुनिल पारखी हे येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. नगरसचिव पदावर शासकिय अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे पत्र प्रशासनाने राज्य शासनाला पाठविले आहे. प्रशासनाने नगरसचिव पदावर कामासाठी शिक्षण आणि अनुभवाचे निकष असणार्‍या अधिकार्‍यांची चाचपणी केल्यानंतर शासनासोबत पत्रव्यवहार केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

महापालिकेमध्ये आयुक्तांप्रमाणेच पालिकेचे सचिव हे महत्वाचे पद आहे. प्रामुख्याने महापालिकेतील विषय समित्या आणि सर्वसाधारण सभांचे आयोजन तसेच कामकाज करण्याची जबाबदारी ही नगरसचिवांवर असते. विद्यमान नगरससचिव सुनिल पारखी हे येत्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तसेच उपनगरसचिव शेवाळे हे देखिल सप्टेंबर महिनाअखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नवीन नगरसचिव पदांचा शोध सुरू केला आहे. मागील अनेक वर्षामध्ये महापालिका सेवेत अगदी कनिष्ट पातळीपासून कामाचा अनुभव असलेले आणि शैक्षणिक पात्रतेच्या निकषात बसलेल्यांनाच नगरसचिव पदावर नियुक्त करण्यात आले आहे. प्रामुख्याने कायद्याची पदवी हा या पदासाठी महत्वाचा निकष आहे. पारखी आणि पाठोपाठ शेवाळे यांच्या निवृत्तीनंतर या दोन्ही पदांसाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणार्‍या महापालिका सेवेतील अधिकार्‍यांची चाचपणी करण्यात आली असून त्यांच्याकडे विचारणाही करण्यात आली आहे. परंतू ही पात्रता पुर्ण करणार्‍या पाच ते सहा अधिकार्‍यांपैकी दोन अधिकार्‍यांची चौकशी सुरू असल्याने त्यांची नावे मागे पडली आहेत. तर काहींनी असमर्थता दर्शविली आहे. यामुळे प्रशासनाने राज्य शासनाला पत्र पाठवून नगरसचिव पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणार्‍या अनुभवी अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी विनंती केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.