BMC वर आमचाच झेंडा फडकेल याचे कोणाकडे पेटंट नाही; प्रवीण दरेकरांनी खा. राऊतांना लगावला टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईकर ठरवतील महापालिकेतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायचा. त्यामुळे मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल याचे कोणाकडे पेटंट नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांनी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर केली आहे. तसेच राऊत यांनी आत्मविश्वास गमावला आहे. पूर्वीइतका आत्मविश्वास त्यांच्यात दिसत नाही, असेही ते म्हणाले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. भाजपने केलेली विकासकामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता पदवीधरांचा भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची निश्चितच पसंती मिळेल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. राज्य सरकारमधील घटक पक्षात ताळमेळ नाही. कॉलेज बंद आहेत, परीक्षा नाहीत, त्यामुळे सरकारचे धोरण काय हे कळत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड चीड असल्याचेही ते म्हणाले. पदवीधर मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने महपौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णी नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेणार आहे. आमच्याकडे मतभेद नाहीत, महाविकास आघाडी सरकारमध्ये सेना – राष्ट्रवादीचे नेते कॉंग्रेसची फरफट करत आहेत हे या पक्षाला कळायला हवे, असेही दरेकर म्हणाले. निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवूून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू व या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊ, असे पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले.