Pune News : ग्रामपंचायतीचे मतदान संपल्यावर महिला उमेदवाराच्या घरात घुसून अंगावर टाकला गुलाल

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कुडजे गावात ग्रामपंचायतीचे मतदान संपल्यावर महिला उमेदवाराच्या घरात शिरुन त्यांच्या अंगावर गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सुमित राजेंद्र घुमे (वय 24) व मयंक कैलास कांबळे (वय 24, रा. कुडज) यांना अटक केली आहे. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडजे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे शुक्रवारी मतदान होते. तक्रारदार या तळजाई माता पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. मतदान संपल्यानंतर त्या घरी गेल्या. त्यांच्या विरोधी भैरवनाथ पॅनेलमधील दोघे जण रात्री उशीरा गुलालाचे पोते घेऊन जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न करुन अंगावर गुलाल टाकला. विरोधात उभी राहतेस काय, तुला निकालाच्या दिवशी बघुन घेतो नाही खलास केले तर बघ अशी धमकी दिली.