Pune : आळेफाटा येथे 16 लाखांचा गुटखा जप्त, जिल्ह्यातील गुटखा किंग बाबाजी वाजेविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व आळेफाटा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करुन अवैधरित्या साठा करुन ठेवलेला गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 16 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) रात्री करण्यात आली. याप्रकरणी बाबाजी उर्फ गणेश वाजे याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पुणे ग्रामीण एटीएस पथकाचे किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी हे आळेफाटा हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना आळेफाटा येथे अवैधरित्या गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ग्रामीण एटीएस आणि आळेफाटा पोलिसांनी परिसरात शोध घेऊन आरोपीने अवैधरित्या साठा करुन ठेवलेला गुटखा जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी हीरा, विमल, आरएमडी असा तंबाखू मिश्रीत 16 लाख 20 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डौले, एटीएस पथकाचे किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, पोलीस नाईक पठारे, लोंढे, पोलीस शिपाई आनंदगावकर, डामसे, वैद्य, गर्जे, कुलकर्णी, करे या पथकाने केली आहे.