Pune : चिखलीतून कोंढव्यात पाठवण्यात आलेला 55 लाख रुपयांचा गुटखा गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिखली भागातून कोंढव्यात पाठवण्यात आलेला 55 लाख रुपयांचा गुटखा गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पडकला आहे. नगर रस्त्यावर हा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी चिखली येथील नरेश देवासी, कोंढव्यातील सुरेश भाटी, वाहन चालक लखन लोंढे (रा. मोशी) यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा, हवाला व नामांकित कंपन्याचे बनावट वस्तू विक्री करणाऱ्या बड्या हस्तीवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखेने गुटखा प्रकरणात “टपरी”विक्री ते राज्यात उत्पादन कंपन्यावर कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई आणखी जोरदार करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा खबऱ्याकडून माहिती काढत कारवाई करत आहेत.

यादरम्यान नगर रोड महामार्गवरून 2 पिकअपमधून गुटखा पुण्यात पुरवठा करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने महामार्गावर सापळा रचला. तसेच साडे सहा वाजण्याच्या सुमारास दोन गाड्या पकडण्यात आल्या. त्याची झडती घेतली असता दोन्ही गाड्यात आरएमडी आणि विमल गुटखा मिळून आला आहे. 55 लाख रुपयांचा हा गुटखा आहे.

यानंतर या वाहन चालकांकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी त्याने हा गुटखा चिखली येथील नरेश देवासी याने कोंढवा येथील सुरेश भाटी याला पाठवला असल्याचे सांगितले आहे. आता या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुटखा कोठून आणला याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, सचिन ढवळे, सुरेंद्र साबळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.