Pune : रविवारपासून व्यायामशाळा, जीम सुरू ! हॉटेल्स फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे 50 % क्षमतेनुसार राहणार रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दसर्‍याचा मुहूर्त साधत राज्य सरकारनं राज्यातील व्यायामशाळा आणि जीम काही अटींवर 25 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (शनिवार) यासंदर्भातील एक आदेश काढला असून पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा आणि जिम उद्यापासून म्हणजेच रविवारपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुरू होणार आहेत. दरम्यान, शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार हे 50 टक्के क्षमतेनुसार सकाळी 8 ते रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्यान सुरू राहणार आहेत. यापुर्वी त्यांना रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती.

सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशातील मार्गदर्शक सुचना आणि अटींचे पालन करणे हे सर्वांना बंधनकारक असणार आहे. आयुक्तांनी आज काढलेला आदेश हा पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे.