Pune : कोरोना लसीकरणासाठी होतोय हॅकरचा वापर?

पुणे : कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. शासनाने त्यावर लस उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला 60 वयोगटांपुढील, त्यानंतर 45 आणि आता 18 ते 44 पर्यंतच्या सर्वांना लस देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी लस कोसो दूर असल्याची तक्रार उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी आमदार अशोक पवार यांच्यापुढे मांडली.

जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती हवेली, ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या वतीने उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त तहसीलदार हवेली विजय कुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुचेता कदम, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, ग्राममविकास अधिकारी यशवंत डोळस, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता कांचन, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमित कांचन, वळती सरपंच एल. बी. कुंजीर, भवरापूरचे सरपंच सचिन सातव, सामाजिक कार्यकर्ते विलास साठे, टिळेकरवाडीचे पोलीस पाटील विजय टिळेकर, कोरेगाव मूळचे पोलीस पाटील वर्षा कड व उरुळी कांचन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी अशोक पवार यांच्यापुढे लसीकरणामधील तुटीविषयी तक्रारींचा पाढा वाचला.

सरपंच संतोष कांचन म्हणाले की, शासनाने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी साईट दिली आहे. मात्र ती साईट अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाल्याचे दाखवित आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटला रेंज मिळत नाही, त्यामुळे नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी करता येत नाही. काही मंडळींकडून ती साइट हायजॅक तर केली जात नाही, याची चौकशी करावी. शासनाने दिलेल्या ऑनलाइन नोंदणीमध्ये रविवारी (दि. 9) उरुळी कांचनमधील दोन नागरिकांची नोंदणी झाली आहे. उर्वरित 98 जण पुणे-मुंबई शहरातील नागरिक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नोंदणी करून लस देण्याऐवजी थेट लस देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले की, लसीकरणाचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आताच त्यामध्ये कुठलाही बदल करणे कठीण आहे. केंद्राच्या नियोजनामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येत नाही, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये वीज आणि इंटरनेटची अडचण आहे, ती सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

उरुळी कांचन येते आरटीपीसीआर केंद्राची गरज
कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील नागरिकही सैरभर झाले आहेत. त्यामुळे उरुळी कांचनमध्ये आरटीपीसीआर केंद्र सुरू करावे, तसेच त्यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य मिळेल, असे नियोजन असले पाहिजे. कारण उरुळी कांचन लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणासाठी नोंदणी झालेल्यांमध्ये पुणे-मुंबईतील नागरिकांचा जास्तीचा समावेश दिसत आहे. ही पद्धत थांबली, तरच ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची लस मिळेल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.