Pune : विकेंडचा चौथ्या रविवारी हडपसर बाजारपेठ बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल महिन्यापासून पाच दिवस 7 ते 11 आणि दोन दिवस पूर्णतः बंद असे कडक निर्बंध लागू केले आहेत. चौथ्या विकेंडच्या रविवारी हडपसर बाजारपेठ पूर्ण बंद, तर पोलीस यंत्रणा रस्त्यावर होती. सामिष भोजनावरही कोरोनाचे सावट आले आहे. कडक निर्बंधाच्या चौथ्या रविवारीही हडपसर परिसरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठांमधील सर्व व्यवहार ठप्प होते. हडपसर गाडीतळावर पोलिसांची व्हॅन, तर गांधी चौकात वाहतूक पोलीस कार्यरत होते. खाकी वर्दीतील पोलीस रस्त्यावर पाहणी करीत होते. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली नाही. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तुरळक वाहतूक सुरू होती.

महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी वृत्तपत्र कार्यालयांना सुटी होती, त्यामुळे आज वृत्तपत्रांच्या स्टॉललाही सुटी होती. त्यामुळे वृत्तपत्र खरेदीसाठी येणारा वर्गही काहीसा कमी झाला होता. मात्र, काही भाजीविक्रेते रस्त्यालगत बसले होते. मात्र, पोलिसांचा मोर्चा त्यांच्या दिशेने जाताच त्यांनी घर गाठले.

दरम्यान, गांधी चौकातील मजूर अड्ड्यावर थांबलेल्या दहा-पाच मजुरांमध्ये कधी एकदा कोरोना महामारी संपते अशी चर्चा सुरू होती. महामारीमुळे मागिल महिन्याभरापासून रोजगार नाही, त्यामुळे हातात पैसा नाही, अशी अवस्था झाल्याने आता उपासमारीची वेळ आली आहे. ही व्यथा सांगायची तरी कोणाला आणि आमचे गाऱ्हाणे तरी कोण ऐकणार, पोलीस म्हणतात घरात बसा. होय… होय…. होय… आम्हाला बी घरात बसायला आवडते की, नाही कोण म्हणत आहे. तुमचे पगार चालू आहेत, आम्ही काम केले तर दाम मिळते. तुम्हाला काय जाते घरात बसा म्हणायला असे पुटपुटत ही मंडळी घराकडे जड पावलाने चालली होती. मंत्र्या-संत्र्यांचे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार बंद केले म्हणजे त्यांना कळेल काय अवस्था होते. एका पोलीस कर्मचाऱ्याने हे ऐकले आणि म्हणाले की, आम्ही काम करून तुम्हाला पगार देऊ का. तुम्ही पगार नका देऊ, पण निदान कामासाठी थांबलो, त्यासाठी सहकार्य करता आले तर करा, असा दबक्या आवाजात बोलत एक मजूर निघून गेला.

मागिल वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर मजूर अड्ड्यावर अनेकांनी अन्नधान्य, तर काहींनी भोजन व्यवस्था केली होती. मात्र, यावर्षी कोणीही फिरकले नाही. आम्हाला फुकट काही नको, भीक नको हो. आमच्या हाताला काम द्या, आम्ही कष्ट करून जगणारी स्वाभीमानी मजूरवर्ग आहोत.