Pune : हडपसर परिसरातून 4 महिन्याच्या बाळाचं अपहरण करणारी 22 वर्षीय युवती सापडली, पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बसप्रवासात ओळख करून 4 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला हडपसर पालिसांनी पकडले आहे. तीन दिवसांनंतर तिला पकडण्यात यश आले असून, बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.

अरुणा राजेंद्र पवार (वय 22, रा. हडपसर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी महिला नगर जिल्ह्यातील लोणी गावची आहे. पतीसोबत वाद झाल्याने ती रागाच्या भरात घरातून आपल्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन बाहेर पडली. त्यानंतर नगरमध्ये आली आणि तेथून नगर ते सातारा या बसमध्ये बसली. त्याचवेळी आणखी एक महिला त्या सीटवर येऊन बसली. फिर्यादी यांच्याशी गप्पा मारत ओळख वाढवली. दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. तेथून आरोपी महिला तिला घेऊन हडपसर भागात पीएमपीएल बसने घेऊन गेली. डी.पी. रोडवर गेल्यानंतर चायनीज खात असताना अचानक आरोपी महिलेने फिर्यादी यांच्याजवळील बाळ हातात घेतले व बाळाला घेऊन पसार झाली होती. या गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस करत होते.

परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम हे स्वतः या महिलेचा कसून शोध घेत होते. त्यावेळी ही महिला मगरपट्टा सिटी परिसरात कामाला असल्याची माहिती समजली. त्यानुसार तिचे नाव व पत्ता मिळवला. आज पोलिसांनी अरुणाला पकडले. अरुणा ही मगरपट्टा सिटी परिसरात मिळेल ती कामे करत होती. लॉकडाउनमध्ये तिची नोकरी गेली आहे. तिने अपहरण का केले, याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.