Pune : घरफोडया अन् सोनसाखळी चोर्‍या करणार्‍या सराईतांना हडपसर पोलिसांकडून अटक, 8 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घरफोड्या आणि सोन साखळी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणत पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय 20, रा. मांजरी बुद्रुक) आणि सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय 30, रा. बिराजदारनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यात घरफोड्या व सोन साखळी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना या चोरट्यांचा माग काढून पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान हडपसर पोलीस एका सोन साखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी त्यांना दोन मगरपट्टा ओव्हरब्रिज खाली थांबले आहेत. त्याची माहिती काढण्यात आली. तसेच याठिकाणी सापळा रचून दोघांना पकडले. यावेळी सोन साखळी चोरीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन साखळी त्यांच्याकडे सापडली. त्यांना अटक करत सखोल तपास केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीने घरफोडी व सोन साखळी चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 8 गुन्ह्यातील 195 ग्रॅम सोने व दुचाकी असा 5 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हडपसर व खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे गुन्हे आहेत.

यातील अजयसिंग दुधाणी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो एकूण 13 गुन्ह्यात फरार आहे. त्याचे वडील अर्जुनसिंग हे देखील सराईत गुन्हेगार असून, ते सध्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या मोक्काच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे. तर अजयसिंग याने लॉकडाऊनच्या काळात निगडी भागातून एटीएम चोरी केली होती. त्यात त्याला अटक केली होती. पण तो या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला. त्यानंतर पुन्हा त्याने सोन साखळी चोरी व घरफोड्या करण्यास सुरुवात केली आहे.

ही कारवाई उपायुक्त नम्रता पाटील-चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक साठे, सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, कर्मचारी प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, अकबर शेख, विनोद शिवले, शहीद शेख, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, श्रीकांत पांडुळे, निखिल पवार, प्रशांत दुधाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

You might also like