शहर-जिल्हयात घरफोडया करत धुमाकूळ घालणार्‍या Top मोस्ट गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी अटक, 11 गुन्हयातील 6 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरासह जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टॉपमोस्ट गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून 11 गुन्ह्यांची उकल करत 6 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सन्निसिंग पापासिंग दुधानी (वय 19, रा. हडपसर), अक्षय संतोष सोनी (वय 28, रा. सुरक्षानगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा साथीदार बिरजूसिंग रजपुतसिंग दुधानी (वय 35) व एका अल्पवयीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

लॉकडाऊन काळात घरफोड्या तसेच वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात दररोज सरासरी दोन ते तीन घरफोड्या होत आहेत. त्यामुळे या घटना थांबविण्यासाठी गस्त वाढवून सराईतावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालून घरफोड्या करणाऱ्यांवर लक्ष ठेवत होते. यावेळी गस्तीवर असताना या आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या दोघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोड्या आणि वाहन चोऱ्या केल्या असल्याबाबत कबुली दिली. तसेच त्यांनी फरार असणाऱ्या साथीदारांसोबत या चोऱ्या केल्या असल्याबाबत सांगितले. त्यांना अटककरून सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी हडपसर भागात 7 घरफोड्या, मुंढवा येथील 3 व चिंचवड येथील 1 असे 11 गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून घरफोड्याच्या घटनेत चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज जप्त करत एकूण 6 लाख 10 माल जप्त केला आहे.

दरम्यान सन्निसिंग दुधानी आणि अक्षय सोनी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. टॉपमोस्ट गुन्हेगारापैकी असून, सन्निसिंग याच्यावर जवळपास यापूर्वीचे 20 गुन्हे दाखल आहेत. तर अक्षय याच्यावर 25 गुन्हे दाखल आहेत. पुणे , पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि धुळे जिल्ह्यात त्यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हिमालय जोशी, सहायक फॉजदार युसूफ पठाण, रमेश साबळे, राजेश नवले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोनपे, प्रवीण उत्तेकर यांच्या पथकाने केली आहे.