दरोड्याच्या तयारीतील अट्टल दरोडेखोरासह 2 अटकेत, हडपसर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरमधील बिराजदारनगर झोपडपट्टीच्या मागिल कालव्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले, तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलसह 81 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांच्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय 28, रा. दोघे सर्व्हे नं.108,109, रामटेकडी, हडपसर) आणि अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24, कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे) या दोघांना अटक केली. तर सन्नीसिंग पापासिंग दुधानी (वय 22, रा. बिराजदारनगर, हडपसर, पुणे), बिरजूसिंग रजपूतसिंग दुधानी, रविसिंग शामसिंग कल्याणी (रा. दोघेही स.नं.110, रामटेकडी हडपसर, पुणे), हे तिघेजण पळून गेले असून, त्यांचा पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, बिराजदारनगर झोपडपट्टीच्या पाठीमागील दर्ग्याजवळ पाचजण थांबले असून, सोन्याचे दुकान फोडण्याबाबत बोलत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई नितीन मुंढे व पोलीस नाईक विनोद शिवले यांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस दाखल होताच पाचही आरोपींनी धूम ठोकली. मात्र, त्यातील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर तिघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे तपास केला असता, त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे दोन मोटारसायकलसह, एक कुकरी, लोखंडी कटावणी, बोबर कटर, मिरची पूड, नायलॉन दोरी असे एकूण 81 हजार रुययांचा मुद्देमाल आढळून आला असून, तो जप्त केला आहे. तिलकसिंग गब्बरसिंग टाक याने एका महिलेवर तलवारीने वार करून तो फरार झाला होता. त्याचा भाऊ आणि वडिल अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर सुमारे 100 हूनअधिक गुन्हे दाखल आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी, युसूफ पठाण, संपत औचरे, राजेश नवले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.