पुण्यातील 16 वर्षीय मुलाला नग्न करून मारहाण करणार्‍या 5 जणांना अटक, केलं होतं तोंडावर मुत्रविजर्सन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसर भागात शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने अन लाथा-बुक्यांनी मारहाण केल्यानंतर त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना घडली. पिडीत मुलावर उपचार सुरू असून तो अद्यापही शुद्धीवर आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. याघटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

विनीत सूर्यकांत बिरादार (वय 19), शुभम राजाभाऊ जाधव (वय 19, रा. समर्थनगर, पिंपरी-चिंचवड), देविदास उर्फ देवा घनशाम पाहणे (वय 21, रा. काळेपडळ), भारत विशाल राठोड (वय 21, कुंजीरवस्ती), सलीम कलिंदर शेख (वय 22, रा. घुलेवस्ती, मांजरी) या पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलाच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा व त्याचे कुटूंबिय मांजरी परिसरात राहतात. दरम्यान, मुलगा 12 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त घराबाहेर पडला होता. याबाबत त्याने त्याच्या घरच्यांना माहिती दिली होती. परंतु, रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याचा पोलिस शोध घेत होते. त्याचवेळी हडपसर पोलिसांच्या बीट मार्शलला मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तो बेशुद्ध असल्याने त्याची ओळख किंवा इतर माहिती मिळत नव्हती.

दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या मुलगा तोच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांना बोलावून त्याबाबत खात्री केली. त्यावेळी तोच असल्याचे समोर आले. यानंतर या मुलाची ओळख पटली. पोलिसांनी मारहाण करणार्‍या तरुणांचा शोध घेऊन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.