Pune : कडक निर्बंध असूनही घराबाहेर पडणाऱ्या 526 जणांवर हडपसर पोलिसांची कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केल्यानंतर 17 एप्रिलपासून आजपर्यंत हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध गुन्ह्यातील 526 जणांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय सुरू असलेली दुकाने, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेशिवाय अर्धे शटर उघडे ठेवून व्यवहार करणारी दुकाने, नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल्स, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, कामाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्यांचा समावेश आहे, असे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.

कदम म्हणाले की, मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर बेंड नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा आहे, अशी भयावह स्थिती आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःच घराबाहेर न पडण्यासाठी बंधने घालून घेणे सर्वांच्याच हिताचे आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अधिकारी-कर्मचारी नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहेत. फुरसुंगी, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, ससाणेनगर, हडपसर गाडीतळ या ठिकाणी नाकाबंदीदरम्यान नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. रात्री-अपरात्री अडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विकास राऊत, रत्नदीप गायकवाड, विश्वास भाबड, मनोज पाटील, सचिन थोरात, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव, सागर पोमण, पोलीस शिपाई श्याम येवले, सागर दळवी, हनुमंत दुधभाते, चेतन साळुंखे, रवींद्र बारटक्के, हनुमंत झगडे, सूरज कुंभार, विट्ठल चिपाडे, राहुल गिरमे, विलास राठोड, गौतम हटकर, महेश मदने, सचिन हनवते, अमोल कदम, अमोल बाबर, रामेश्वर नवले, गितेश पिसाळ यांचे पथक कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत, त्यामुळे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, दूध-भाजीपाला, किराणा मालाची दुकाने, औषधांच्या दुकानामध्ये गर्दी करू नका, असे सांगत नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहे, असे कदम यांनी सांगितले.

दरम्यान, कदम म्हणाले की, नागरिक घराबाहेर पडण्यासाठी औषध आणायचे आहे, स्कॅनिक करायचे आहे, बँकेत पैसे भरायचे आहेत, नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये पैसे द्यायचे आहेत, रक्त द्यायचे आहे, केबल दुरुस्त करायची आहे, इंटरनेट बंद पडले आहे, सोनोग्राफी कऱण्यासाठी चाललो आहे, नातेवाईक दवाखान्यात आहेत, डॉक्टरांनी पैसे भरण्यासाठी बोलावले आहे, असे एक ना अऩेक कारणे सांगत आहेत. नागरिकांनी आता स्वतःला आवर घालण्याची वेळ आली आहे. स्वतःबरोबर कुटुंबीयांसाठी नागरिकांनी आता कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.