Pune : हडपसरवासियांसाठी लवकरच मल्टिस्पेसालिटी हॉस्पिटल – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हडपसरवासियांसाठी लवकरच 200 बेडचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू होईल. त्यासाठी मगरपट्टा चौकातील खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालयाची जागा ताब्यात घेतली आहे. येथील युनिट-5 चे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित केले आहे. त्यामुळे मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यातील कोरोनाचा धोका ओळखून लहान मुलांसाठी 10 बेडचे अत्यावश्यक व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवले जाणार आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. कोल्हे यांनी हडपसर (मगरपट्टा चौक) येथील पुणे महापालिकेच्या खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालयाची पाहणी केली. याप्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील, याप्रसंगी माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेविका वैशाली बनकर, पूजा कोद्रे, हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदास चुडाप्पा आदी उपस्थित होते. यावेळी खासदार कोल्हे हडपसर विधानसभा मतदारसंघातील लसीकरणाविषयी माहिती जाणून घेतली.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शहराबरोबर उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यातच पुणे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसर जगाच्या नकाशावर झळकत आहे. हडपसर परिसरात यापूर्वीच सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणे गरजेचे होते. सध्या वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे हडपसर परिसरात महापालिकेचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आमदार तुपे यांच्यासह आमचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर युनिट-5 ला दिलेली जागा मनपाच्या ताब्यात आली आहे. या जागेमध्ये 200 बेडचे दोन टप्प्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात एक इमारत बांधून त्यात सध्याचे रुग्णालय स्थलांतरीत केले जाईल. त्यानंतर उर्वरीत दुसऱ्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाली की हडपसरवासियांसाठी सर्वसोयींनीयुक्त असे रुग्णालय उपलब्ध होईल. तोपर्यंत सध्याच्या इमारतीमध्ये स्वच्छता व डागडुजी करून लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तसेच हडपसर भागातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या मदतीने ओपीडीही सुरू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार चेतन तुपे म्हणाले की, अतिरिक्त आयुक्तांना काल रुग्णालयाचा आराखडा दाखवला असून, त्याप्रमाणे आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे पाहणी केली. हॉस्पिटलचे काम त्वरित सुरू करावे, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी लोकप्रतिनिधीनी दर्शवली आहे. आता आहे त्या ठिकाणी कोविड रुग्णांची सोय करता येईल व मोकळ्या जागेत फेज वन हॉस्पिटलची इमारत बांधून पूर्ण झाल्यावर जुन्या जागेतील हॉस्पिटल स्थलांतर करून फेस-2 चे काम केले जाणार आहे. आमदार तुपे यांच्या प्रस्तावास महापालिका प्रशासन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भविष्यातील कोरोनाचा धोका ओळखून लहान मुलांसाठी 10 बेडचे अत्यावश्यक व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवले जाणार आहे.

पालिकेच्या इमारतीमधील युनिट-5 ची जागा मोकळी करून घेतली आहे. त्या ठिकाणी खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालयामध्ये लवकरच ऑक्सिजन बेड सुरू होईल. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढून काम तातडीने मार्गी लावले जाणार आहे. कोविड हॉस्पिटलसाठी 46 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून लहान मुलांसाठी लागणारे व्हेंटिलेटर, आयसीयूसाठीची साधनसामुग्रीसह वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.