त्यानं Google ला ‘गुरू’ बनवलं अन् पुण्यातील कोंढव्यात सुरू केला होता 2000 च्या बनावट नोटा छापण्याचा ‘कारखाना’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीत कामावर असताना अचानक त्याचे काम सुटले. बेकार असताना त्याने इंटरनेटवर सर्च करत असताना त्याला मोठे घबाडच सापडल्यासारखे झाले. त्याने गुगललाच आपले गुरु बनविले आणि त्यावरुन शिकून त्याने चक्क कोंढव्यात बनावट नोटा बनविण्याचा कारखाना टाकला.

५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाबंदीनंतर मोदी सरकारने २ हजार रुपयांची नोट चलनात आणली आहे. ही नोट बनावट तयार करता येणार नाही, असा दावा केंद्र सरकारने केला होता. पण या उद्योगी तरुणाने भाड्याने घेतलेल्या बंगल्यात चक्क २ हजार रुपयांच्या नोटा छापण्याचा कारखाना सुरु केला. तब्बल एक वर्षभर तो सरकारच्या नाकावर टिचून घरात २ हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करत होता व आपल्या साथीदारामार्फत पुण्यासह हैदराबाद, केरळमध्ये त्याची विक्री करत होता.

निधीश ऊर्फ पंडीत विनायक कळमकर ऊर्फ अक्षय विलास शर्मा (वय ३६, रा. उंड्री) असे त्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला केरळमधून ताब्यात घेऊन पुण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

त्याचे दोघे साथीदार भवानी पेठेत या नोटा चलनात आणण्यासाठी व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आले असताना गुन्हे शाखेने सापळा रचून त्यांना पकडले होते. त्यांच्याकडून ६४ हजार रुपयांच्या २ हजार रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. शुभम दिलीप क्षीरसागर (वय २४, रा. लोणंद, ता. खंडाळा) आणि राहुल दिनकर वचकल (वय १९, रा. वीर, ता. पुरंदर) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना खंडणी विरोधी पथकाने २८ जुलै २०१९ रोजी पकडले होते. याचा सुगावा लागल्यावर पंडित कळमकर हा हैदराबादला पळून गेला होता. खंडणी विरोधी पथकाने त्याच्या उंड्री येथील बंगल्यावर छापा टाकला तेव्हा तेथे नोटा बनविण्याचे साहित्य आढळून आले होते.

पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर तो पुण्यातून पळून हैदराबाद येथे गेला. पण तेथेही त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या केसेस असल्याने हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली होती. केरळमध्येही त्याच्यावर केसेस होत्या. त्यामुळे हैदराबाद पोलिसांकडून केरळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याला केरळ पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.