Pune : आत्महत्या करण्यासाठी तो मुंबईहून आला होता पुण्यात, पोलिसांनी वाचवलं

खेड शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  दीपक बस्सी हे मुंबईतील चेंबूर येथील राहणारे रहिवाशी आहेत. ते सुसाईट नोट लिहून शुक्रवारी सकाळी आपली कार घेऊन चेंबरहून खेड-शिवापुरला निघून आले. बस्सी हे खेड-शिवापुरला कोंढणपूर फाट्यावर विषारी औषध पिण्याच्या तयारीत असतानाच राजगड पोलिसांनी पकडल्याने त्यांचे प्राण वाचले. जीपीएस प्रणालीद्वारे मुंबई पोलिसांनी राजगड पोलिसांना त्यांचे लोकेशन कळवले. मुंबई सायबर क्राईम ब्रँच आणि राजगड पोलिसांनी सतर्कता दाखवून दीपक बस्सी यांना आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्यांचे प्राण वाचले.

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर, मुंबई येथून एक जण सुसाईट नोट लिहून कारगाडीने साताऱ्याच्या दिशेने निघाले असून त्यांचे लोकेशन कात्रज बोगद्याच्या पुढे दाखवत आहे, अशी माहिती शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजगडचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांना मुंबई सायबर क्राईम ब्रँचकडून मिळाली. त्याबरोबर घोरपडे यांनी ताबडतोब आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन टोलनाका आणि कोंढणपूर फाट्यावर नाकाबंदी लावली. या काळात मुंबई सायबर क्राईम ब्रॅंचच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी होळकर आणि फौजदार गणेश शिर्के हे राजगड पोलिसांच्या संपर्कात राहून बस्सी यांच्या गाडीचे लोकेशन सांगत होते.

बस्सी हे खेड-शिवापूर येथील दर्गा फाट्यावरून गाडी परत फिरवून कोंढणपूर फाट्यावर आले. त्याठिकाणी एका बाजूला गाडी थांबवून ते विषारी औषध पिण्याच्या तयारीत असतानाच राजगड पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून विषारी औषधाची बाटली घेतली. बस्सी यांना ताब्यात घेतल्यानंतर राजगड पोलिसांनी हा प्रकार मुंबई सायबर क्राईम ब्रँचला कळवला. त्यांनतर मुंबईहून बस्सी यांचे नातेवाईक खेड-शिवापुरला आले. बस्सी यांच्याकडे चौकशी केली असता आर्थिक कारणातून आत्महत्या करण्याचा विचार होता, असे त्यांनी सांगितले. राजगड पोलिसांनी बस्सी यांचे मनपरिवर्तन करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, पोलिस हवालदार संतोष कालेकर, अनिल वाघमारे, सचिन कदम, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

“एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुणे-सातारा रस्त्याने कार घेऊन निघाला असल्याची माहिती आम्हाला मुंबई सायबर क्राईम ब्रँचकडून मिळाली होती. त्यानुसार आम्ही तत्काळ नाकेबंदी लावून गाडी नंबरच्या आधारे बस्सी यांच्यापर्यंत पोचुन त्यांना ताब्यात घेतले. मुंबई सायबर क्राईम आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एक जणाचा जीव वाचला.” असे राजगडचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे म्हणाले.