Pune : हेल्मेटसक्ती आणि दंडात्मक कारवाई थांबवावी : आमदार शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दुचाकी वाहनचालकाने हेल्मेट न घातल्यास त्याच्याकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या कारवाईस ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना केली आहे.

हेल्मेटचा वापर व्हावा यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे, पण त्याची सक्ती केली जाऊ नये, अशी भूमिका आमदार शिरोळे यांनी पोलीस आयुक्त आणि वाहतूक उपायुक्तांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. पुण्यात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. सध्या कोरोना साथीच्या काळात कारवाईला तातडीने स्थगिती दिली जावी, दंड माफ करावा, अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत, असे शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेल्मेटचा दंड, मास्कचा दंड असे विविध प्रकारचे दंड आकारणे सद्यस्थितीत नागरिकांना परवडणारे आहे का ? याचाही सरकारने विचार करण्याची वेळ आली आहे, अशीही भूमिका आमदार शिरोळे यांनी मांडली आहे.