फडणवीस सरकारच्या काळात जळगावच्या बड्या नेत्याचेही फोन टॅप झाले, गृहमंत्री अनिल देखमुखांनी स्वतः सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात फोन टॅप केले असून, त्यात जळगावमधील एका बड्या नेत्याचाही फोन टॅप करण्यात आला आहे. त्यांनी तशी तक्रार केली असून, त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पुणे दौर्‍यावर असणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी त्यांना फोन टॅपिंग प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले विधानसभा निवडणुकांपुर्वी तत्कालीन भाजप सरकारने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षातील काही बड्या लोकांचे फोन टॅप केले आहेत. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. काही अधिकार्‍यांना इस्त्राईलला पाठविण्यात आले. त्यांच्यामार्फत अद्यावयात तंत्रज्ञान आणण्यात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच जळगावमधील एका बड्या नेत्याचेही फोन टॅप झाले आहेत. तशी तक्रार त्यांनी केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती स्थापित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांना दिलासा
मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुलाने सरकारी कंत्राट घेतल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, माध्यमांमधूनच ही बाब समजली आहे. त्यानुसार याप्रकरणाची माहिती घेतली असून 2017 मध्ये बर्वेंच्या मुलाने कंत्राट घेण्याची शासकीय परवानगी घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचार झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You might also like