कौतुकास्पद ! तब्बल 25 तोळे सोनं सापडलं, पुण्यातील ‘इमानदार’ रिक्षाचालकांनी परत केली बॅग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेने पुण्यात आलेल्या एका प्रवाशाची 25 तोळ्यांचे सोने असणारी बॅग दोन रिक्षा चालकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा परत मिळाली आहे. आयटी इंजिनिअर तरूणाने त्यांचे आभार मानले असून, त्यांचे सवत्र कौतुक होत आहे.

अतुल पांडुरंग टिळेकर (वय 36, रा. हडपसर) भरत किसन भोसले (वय 46, गणेश पेठ) अशी या प्रामाणिक रिक्षा चालकांची नावे आहेत.

अतुल टिळेकर हे रिक्षा चालक असून, रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालवितात. तर, भरत हे देखील रिक्षा चालक आहेत.

दरम्यान, हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटीत राहणारे दीपक पांडुरंग चित्राला हे कुटूंबासोबत बाहेर गावी गेले होते. ते रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेने पुण्यात परत आले. यावेळी त्यांच्यासोबत आई-वडिल व नातेवाईक होते. तसेच, साहित्यही मोठ्या प्रमाणात होते. रेल्वेतून उतरल्यानंतर त्यांनी कॅब बुक केली. कॅब आल्यानंतर घाईत त्यांची 25 तोळ्याचे दागिने असणारी बॅग विसरली. बॅग विसरून ते घरी गेले. त्याचदरम्यान अतुल टिळेकर यांना बेवारस बॅग आढळून आली. यामुळे त्यांनी बॅग घेतली आणि पाहली. त्यावेळी त्यात सोन्याचे दागिने दिसून आले. त्यांनी तत्काळ मित्र भरत भोसले यांना याची माहिती दिली. त्या दोघांनी बॅग रेल्वे पोलिसांकडे दिली.

त्याचदरम्यान, दिपक हे बॅग विसरल्याने शोधण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात परत आले. त्यांनी रिक्षा चालकांना विचारपूस केली. त्यावेळी त्यांना एक बॅग सापडली असून, ती रेल्वे पोलिसांकडे देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचारी संजय सोनवणे यांनी दिपक यांना बॅग सापडली असून, ओळख पटवून घेऊन जाण्यास सांगितले. ओळख पटल्यानंतर त्यांना साडे सात लाख रुपायांचे 25 तोळे सोन्याचे दागिने असणारी बॅग परत केली.

पोलीस आणि रिक्षाचालकांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणा मुळे दिपक यांनी सर्वांचे आभार मानले. रिक्षा चालक व पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होऊ लागले आहे.