Pune : नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल्स, बार आणि मॉल्स सील करणार; अंमलबजावणीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथक : विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. ‘सुपरस्प्रेडर’ ठरणार्‍या घटकांच्या तपासणीसोबतच अन्य राज्यांतून रेल्वे आणि विमानाने येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी व्यापक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातही मागील काही दिवसांत ऑक्टोबरच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या दररोज ४०० च्या आसपास असलेली नवीन रुग्णसंख्या ७०० च्या जवळपास पोहोचल्यास शहराच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. ही शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

यासंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की आजच एअर पोर्ट अ‍ॅथॉरिटी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांसोबत बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये अन्य राज्यांतून विमान तळावर आणि शहरातील रेल्वे स्थानकांवर येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलावी लागणार आहेत. प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा लागणार आहे. प्रवासी संख्या आणि रेल्वे स्थानकांची संख्या पाहता, याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खासगी बसेस तसेच राज्य परिवहन विभागांच्या बसेसने येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्लॅनिंग करण्यात येत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांसोबतच अन्य राज्यांतून येणार्‍या अथवा जाणार्‍या खासगी बसेसच्या थांब्यांवरही तपासणीसाठी यंत्रणा निर्माण करण्याची तयारी सुरू करण्याबाबत आजच्या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

शहरातील अनेक हॉटेल्स, बार आणि मॉल्समध्ये फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या अन्य एसओपींची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याकरिता १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर १५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. कोरोनाच्या एसओपीची यापूर्वीही कारवाई झाल्यानंतर तिचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल्स, बार आणि मॉल्स सील करण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले आहेत. यामुळे सर्व व्यावसायिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एसओपींची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.